दौंड : दौंड-पुणे प्रवासादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये महिला व विद्यार्थिनींची काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून होणारी छेडछाड व धमक्यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी दौंड-पुणे शटल मंगळवारी संतप्त महिला व इतर प्रवाशांनी अर्धा तास रोखून धरली, त्यामुळे रेल्वे पोलिस व अधिकाऱ्यांची धांदल उडाली.
नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने दौंड-पुणे असा दररोज प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. याशिवाय केडगाव, यवत, उरुळी कांचन येथीलही महिला व विद्यार्थिनी दौंडहून सकाळी सात वाजून 5 मिनिटांनी सुटणाऱ्या पुणे-दौंड शटलला पसंती देतात. कारण ही वेळ सोयीची आहे. याबरोबरच पावणे नऊच्या बारामती-पुणे शटललाही बऱ्यापैकी गर्दी असते. या दोन्ही गाड्यांमध्ये महिलांसाठी प्रत्येकी एक डबा राखीव आहे. महिला प्रवाशांची संख्या पाहता ते अपुरे आहेत. जागेअभावी काही महिला व...
more... विद्यार्थिनींना इतर डब्यांमध्ये बसून प्रवास करावा लागतो. या डब्यात काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून महिला व विद्यार्थिनींची छेडछाड काढणे, अश्लील भाषेचा वापर करणे, मोबाईलमध्ये महिलांचे फोटो काढणे, डब्यात चढताना महिलांना धक्काबुक्की करणे अशी गैरकृत्ये केली जातात. या संदर्भात जाब विचारल्यास तरुणांकडून शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली जाते, त्यामुळे महिला व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लोणी काळभोर येथील गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने सोमवारी (ता. 1) दौंडमधील महिलांची छेडछाड करून मारहाण करण्याची धमकी दिली, त्यामुळे या महिलांनी पुणे रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. महिलांसाठी दोन डबे राखीव ठेवावेत व गाडीला आणखी चार ते पाच डबे जोडावेत, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार होत आहे. मात्र त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी संतप्त महिला व इतर प्रवाशांनी दौंडला अर्धा तास शटल रोखून धरली. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी दिल्याशिवाय गाडी जागेवरून हलू नये, अशी भूमिका महिलांनी घेतल्याने रेल्वे प्रशासन व पोलिसांची धांदल उडाली. या गाडीबरोबर तीन पोलिस कर्मचारी दिल्यानंतर शटल पुण्याकडे रवाना झाली.